maruti stotra in marathi I मारुती स्तोत्र विषयी संपूर्ण माहिती अर्थासहित.
मारुती स्तोत्र बद्दल विस्तृतपणे माहिती व पठण नियमितपणे केल्याचे फायदे
मारुती स्तोत्र हे प्रभू श्रीरामाचे परमभक्त मारुती किंवा हनुमान यांना समर्पित केलेले आहे.
हे स्तोत्र खूपच प्रभावशाली व श्री हनुमानाची उपासना करण्यासाठी खूप योग्य आहे, या स्तोत्राचे नियमित वाचन केल्याने कुठलेही संकट साधकावर येत नाही.
ज्याप्रमाणे तुलसीदासजींनी हनुमान चालीसा मध्ये लिहिले आहे की संकट कटै मिटै सब पीरा,
जो सुमिरै हनुमत बलबीरा, म्हणजे जो व्यक्ती हनुमानाचे खऱ्या मनाने स्मरण करतो त्याचे सर्व प्रकारचे रोग व पिडा नष्ट होऊन जाते.
ह्या कारणामुळेच श्री मारुती स्तोत्रा चे खूप महात्म्य आहे व आपण ते नियमितपणे वाचले पाहिजे.
मारुती स्तोत्राची रचना
श्री मारुती स्तोत्र समर्थ रामदास स्वामींनी रचलेले आहे,
रामदास स्वामी हे बळ मिळवणे, शरीर कमवणे, याबाबतीत सर्वांना उपदेश करायचे व त्यांनी साक्षात बळाचे मूर्तीमंत रूप म्हणून मारुतीची उपासना केली.
उपासना योग्य पद्धतीने कशी करावी त्याची शिकवणी दिली, त्यांच्या शिकवणीचा व उपासनेचा एक भाग म्हणजे हे स्तोत्र आहे.
या स्तोत्रांमध्ये प्रामुख्याने मारुतीच्या शारीरिक बळाचे विविध पैलू दर्शविले आहेत.
सर्वप्रथम आपण श्री मारुतीचं स्मरण करून 🙏 संपूर्ण मारुती स्तोत्र कसे आहे ते बघू व तत्पश्चात आपण
संपूर्ण मारुती स्तोत्राचा अर्थ समजून घेऊ:-
श्री मारुती स्तोत्र
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||
महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||२||
दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा |
पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||
लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ||४||
ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||
ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती |
नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||
पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||
ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||
कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||
आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती |
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||
अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे ||११||
ब्रह्मांडाभोवतें वेढें, वज्रपुच्छें करू शकें |
तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||
आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा |
वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा ||१३||
धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही |
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||
भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही |
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||
हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळागुणें ||१६||
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू |
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||
॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।
चला तर मग आपण आता एकेक करून मारुती स्तोत्राचा अर्थ समजून घेऊ
भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
भीमरूपी म्हणजे प्रचंड मोठा दिसणारा.
महारुद्र - मारुती हा शंकराचा अवतार मानला गेला आहे, कारण मारुतीचेच दुसरे नाव रुद्र असे आहे, त्यामुळे खूप उग्र स्वभावाचा भयंकर असाही या शब्दाचा अर्थ होऊ शकतो.
वज्र हनुमान - मारुतीरायाने जन्मल्या जन्मल्या गोड फळ समजून सूर्यालाच गिळण्याकरिता झेप टाकली होती, तेव्हा इंद्राने अनर्थ होऊ नये म्हणून मारुती वर वज्र प्रहार केला होता.
तो वज्रपार त्याच्या हनुवटीला लागला व त्यामुळेच मूर्च्छित होऊन हनुमान पृथ्वीवर आला अशा प्रकारची एक आख्यायिका आहे, व यावरूनच श्री मारुतीला वज्र हनुमान अशी नावे मिळाली.
मारुती - मरुत देवाचा मुलगा म्हणजेच मारुती व मरुतदेव म्हणजेच वायू देव त्यामुळेच मारुती प्रचंड वेगवान होता.
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
वनारी - वनेच्या वने आपल्या बळाच्या जोरावर समूळ उठून टाकणारा म्हणून वनारी.
अंजनी सुत- अंजनी हे मारुतीच्या आईचे नाव आहे व सूत म्हणजे मुलगा म्हणून अंजनी सूत.
महाबळी प्राणदाता सकळां ऊठवी बळें
महाबळी - प्रचंड बलवान
प्राण दाता - संजीवनी मुळी आणून लक्ष्मणास दिलेल्या जीवनामुळे प्राण दाता.
सकळां ऊठवी बळें -
असा प्रचंड बलवान जो आपल्या बळाच्या जोरावर सगळ्यांना हादरून सोडतो.
सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवदायका
सौख्यकारी - सगळ्यांना नेहमी सुख देणारा.
दुःखहरी- सगळ्या दुःखांचा नाश करणारा.
दुत - मारुती हा रामाचा दूत होता.
वैष्णवदायका- श्रीराम म्हणजे विष्णूचा अवतार व त्यांचे दूत म्हणजे मारुती, त्यामुळे मारुतीची उपासना
केल्यामुळे श्रीरामाची कृपा होते म्हणून वैष्णवदायक असे म्हटले जाते.
दिनानाथा हरीरूपा सुंदरा जगदंतरा
दीनानाथ - गोरगरिबांचा व दिन भक्तांचा वाली रक्षण कर्ता.
हरी रूपा - हरी म्हणजेच श्रीराम व त्यांचेच एक रूप म्हणजे श्री मारुती.
सुंदरा - बळकट व पीळदार असे शरीर असल्यामुळे अतिशय सुंदर दिसणारा.
जगदंतरा- जगदंत याचा अर्थ परलोक असा होतो त्यामुळे मारुती पारलौकिक आहे असे म्हणायचे आहे.
पातालदेवताहंता भव्य सिंदूरलेपना
पाताल देवता हंता - पाताळात वास्तव्य करणाऱ्या दृष्ट शक्तींचा विनाश करणारा.
भव्य - देहाने अतिशय भव्य असणारा.
सिंदूरलेपणा - सर्वांगाला सिंदूर लेप असलेला त्याचप्रमाणे मारुतीच्या मूर्तीला सिंदुराचा लेपही करतात.
लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना
लोकनाथा - जगाचा पालक असणारा व आश्रयदाता.
जगन्नाथा - संपूर्ण जगाचा नाथ असणारा.
प्राणनाथा - मारुतीच्या उपासनेने शरीर हे बळकट व ताकतवर होते, त्यामुळे त्या प्राणाचा रक्षक.
पुरातना- श्री मारुती हा चिरंजीव आहे त्यामुळेच तो अति प्राचीन आहे, व त्याचे अस्तित्व आजचा जगात सगळीकडे आहे त्यामुळेच त्याला पुरातना असे म्हटले गेले आहे.
पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका
पुण्यवंता - जे पुण्यवान आहे ते.
पुण्यशीला-ज्यांचे वर्तन हे नेहमी पुण्य कर्मच असते.
पावना- अतिशय पवित्र
परितोषका - आनंददायक
ध्वजांगे उचली बाहू आवेश लोटला पुढे
ध्वजांगे - ध्वजाचा एक भाग.
उचली- उचलतो.
बाहो-आपल्या बाहूंनी.
आवेशे लोटला पुढे-आवेशाने पुढे घेऊन जातो.
वरील संदर्भ महाभारतातील युद्धाचा आहे अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर हनुमान होता व त्याने आपल्या बाहूबलाने अर्जुनाचा रथ मोठ्या आवेशाने पुढे नेला.
काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भयें
साक्षात मारुतीला पाहून काळ रुपी अग्नि भीतीने कापू लागला मारुतीच्या बलापुढे साक्षात काळाची ही काही चालत नाही.
ब्रह्मांड माइले नेणू आवळे दंतपंगती
माईले-मावले
नेणू -डोळ्यात
श्री मारुतीच्या डोळ्यात सारे ब्रह्मांड सामावले आहे व तो रागाने दात ओठ खात आहे.
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकुटी ताठिल्या बळें
मारुतीच्या डोळ्यातून रागाच्या ज्वाला जणू बाहेर पडत आहेत.
भृकुटी- भुवया, मारुती मोठ्या आवेशाने भुवया ताणून रागाने पाहत आहे व अशा रूपामुळे काळ त्याला खूप घाबरत आहे.
पुच्छ ते मुरडिले माथां किरिटीं कुंडले बरी
मारुतीच्या माथ्यावर मुकुट व कानात सुंदर कुंडले आहेत त्याचप्रमाणे त्यांनी शेपूट फुलारले आहे.
सुवर्ण कटी कासोटी घंटा किंकिण नागरा
मारुतीच्या कमरेला सोन्याची कासोटी बांधलेली आहे व त्यावर त्याचा कडदोरा आपटून घंटा नादासारखा आवाज ऐकू येत आहे.
ठका रे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू
असा दिसणारा हनुमान पर्वतासारखा उभा ठाकलेला आहे तो शरीराने सडपातळ बांधेसूद आहे.
चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लतेपरी
चपळांग - शेपूट मोठी आहे व विजे सारखी चपळ आहे व या शेपूटनेच मारुतीने लंका दहन केलेले आहे
कोटिच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे.
कोटिच्या कोटी - प्रचंड व मोठे उड्डाणे घेऊन मारुती उत्तर दिशेला झेपावला.
मंदाद्रिसारिखा द्रोणू क्रोधें उत्पाटिला बळें
मंदार पर्वतासारखा प्रचंड पर्वत मारुतीने क्रोधाने मुळासकट उपटून टाकला.
आणिला मागुती नेला आला गेला मनोगती
हा प्रचंड पर्वत त्याने लंकेच्या युद्धभूमीवर आणला आणि परतही नेला त्याचा प्रवास हा मनाच्या प्रचंड वेगाने झाला.
मनासी टाकिले मागे गतिसी तुळणा नसे
वेगाच्या बाबतीत त्याने मनालाही मागे टाकले.
वरील संदर्भ रामायणातील द्रोणागिरी पर्वत ज्यावर संजीवनी मुळे सापडली व मारुतीने ती आणून दिली व लक्ष्मणास जीवनदान दिले त्यासंदर्भात आहे
अणुपासोनी ब्रह्मांडाएवढा होत जातसे
हनुमानाला अष्ट सिद्धी प्राप्त होत्या त्यामधील दोन सिद्धी विषयी आता लिहिले आहे.
अनिमा - अनुएवढा सूक्ष्म लहान देह करता येणे.
महिमा- आपल्या इच्छेनुसार किती मोठ्यातला मोठा आकार धारण करता येणे.
म्हणजेच हनुमानाला आपल्या इच्छेनुसार लहान अणूपासून ते ब्रम्हांडापर्यंत कुठलाही आकार धारण करता येत असे.
ब्रह्मांडाभोवते वेढे वज्रपुच्छें करू शके
वज्रासारख्या आपल्या ताकतवर शेपटीने तो अख्ख्या ब्रह्मांडा भोवती वेढे घालू शकतो.
तयासी तुळणा कोठे मेरुमांदार धाकुटे
मारुतीची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही, मेरु मंदार यासारखे प्रचंड पर्वत ही त्याच्यापुढे धाकटे म्हणजेच लहान वाटतात.
तयासी तुळणा कैसी ब्रह्माण्डी पाहता नसे
मारुतीला संपूर्ण ब्रह्मांडात कुणाशी तुलना नाही.
आरक्त देखिले डोळां ग्रासिले सूर्यमंडळा
मारुतीने जन्मल्या जन्मल्या लाल भडक दिसणारे सूर्यबिंब पाहिले व ते गोड फळ समजून घेऊन गिळून टाकण्यासाठी उड्डाण केले होते.
वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा
शून्य मंडळ म्हणजेच संपूर्ण ब्रह्मांड आपला आकार संपूर्ण ब्रह्मांडाला भेदून जाईल असा करणे मारुतीला सहज शक्य होते.
धनधान्यपशुवृद्धी पुत्रपौत्र समस्तहीपावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठे करोनिया
श्री मारुती स्तोत्र पठण करणाऱ्याला धनधान्य पशु यात समृद्धी प्राप्त होते त्याचप्रमाणे पुत्र विद्या रूपही प्राप्त होते.
भूतप्रेतसमंधादी रोग व्याधी, समस्तहीनासती तूटती चिंता आनंदें भीमदर्शनें
मारुती चे नुसते दर्शन घेतल्यानेच, भूत प्रेत सर्व रोग आजार सर्व वंदना चिंता, नाहीशा होतात.
हे धरा पंधरा श्लोकीं लाभली शोभली बरी
हे पंधरा श्लोक स्तोत्र म्हणणाऱ्यास लाभो शोभो, म्हणजे ह्या पठणाचे बल मिळू दे.
दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळागुणें
हे स्तोत्र नियमितपणे म्हणणाऱ्याला शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे सतत वृद्धिंगत होणारा बलिष्ठ बलवान देह प्राप्त होईल.
रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू,रामरूपी अंतरात्मा दर्शनें दोष नासती
रामाच्या सेवकांपैकी सर्वात श्रेष्ठ व वानर कुळाला भूषणावह व ज्याचा अंतर आत्मा प्रत्यक्ष रामाच्या ठिकाणी आहे अशा श्री मारुतीच्या दर्शनाने सर्व दोष पापे यांचा नाश होतो.
इति श्रीरामदासविरचितं मारुतिस्तोत्रं संपूर्णम
अशाप्रकारे रामदास स्वामी यांनी रचलेले मारुती स्तोत्र पूर्ण झाले.
मारुती स्तोत्राचा संपूर्ण अर्थ काय आहे.
समर्थ रामदास स्वामींनी मारुती स्तोत्राच्या पहिल्या 13 श्लोकांमध्ये मारुती म्हणजेच, हनुमानाची ची स्तुती व वर्णन केलेले आहे.
शेवटच्या चार श्लोकांमध्ये मारुतीच्या प्रती चरण श्रुती केली आहे. रामदास स्वामींनी हे पण सांगितले आहे की जो साधक मारुती स्तोत्राचे नियमित पठण करेल त्याला कशा पद्धतीचे लाभ प्राप्त होतात.
मारुती स्तोत्राचे पठण केल्याने होणारे वेगवेगळे लाभ
मारुती स्तोत्राचे पठण केल्यामुळे मारुती प्रसन्न होतो, व आपल्या भक्ताला आशीर्वाद देतो.
त्याचप्रमाणे साधकाच्या जीवनामध्ये सगळ्या प्रकारची सुख शांती येते.
मारुती स्तोत्राच्या पठणाने सगळ्या प्रकारच्या भीतीचा रास होतो, त्याचप्रमाणे मारुतीराया आपल्या भक्तांच्या सर्व कष्टांचे निवारण करून टाकतात.
मारुती स्तोत्राचे नियमित पाठ केल्याने घर परिवारामध्ये धन्य धान्याची वृद्धी होते व घरात असणारी नकारात्मक शक्ती संपूर्णपणे नष्ट होऊन जाते.
मारुती स्तोत्राच्या पाठ केल्याने चोहोकडे फक्त सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो व भक्ताचे सगळे रोग व कष्ट निवारण होऊन जातात, त्याचप्रमाणे शारीरिक आणि मानसिक शक्ती मध्ये खूप मोठी वृद्धी होते.
मारुती स्तोत्र म्हणण्याची पद्धत
मारुती स्तोत्राचे वाचन पहाटेच्या वेळेस व संध्याकाळच्या वेळेस एकदा करायला पाहिजे.
पाठ करण्यासाठी सर्वप्रथम साधकाने स्वतःला शुद्ध करून घ्यावे.
त्यानंतर मारुतीची एक सुंदर प्रतिमा समोर स्वतः व्यवस्थित बसावे.
मारुतीची विधिवत पूजा करावी.
हे सर्व केल्यानंतरच पाठ करण्यास प्रारंभ करावा.
दररोज सकाळ संध्याकाळ एकदाच पाठ केल्यानेही साधकाला खूप शांती मिळते.
पण जर काही विशेष फळप्राप्तीसाठी पाठ करायचा असल्यास अकराशे वेळेस पाठ करावा.
पाठ करत असताना न चुकतांना श्री मारुतीचा ध्यान करावा.
पठण हे स्वर व लयबद्ध असावे.
पठण करताना विनाकारण मोठा आवाज करू नये.
नियमितपणे पठण करत असताना चुकूनही मांसाहार करू नये.
त्याच पद्धतीने दारू सिगरेट पानमसाला तंबाखू गुटखा व इतर मादक पदार्थांचे सेवन टाळावे अन्यथा पाठ करून काही लाभ होणार नाही.
ज्योतिष मधील मारुती स्तोत्राचे पठण केल्याने होणारे फायदे
ज्योतिष शास्त्रानुसार जर आपल्यावर कुंडलीतील वाईट ग्रहांचा परिणाम असेल, तर आपल्याला खूप मोठ्या अडचणी व रोगांना सामोरे जावे लागते.
कुंडलीतील मंगळ शनि राहू केतू हे चार वाईट ग्रह आहेत, जर आपल्या कुंडलित हे ग्रह कमजोर असतील तर आपल्याला उपाय करणे खूप गरजेचे होते, अशा परिस्थितीमध्ये मारुती स्तोत्र म्हणल्यास या ग्रहांचा दोष लवकरात लवकर दूर होऊन जातो.
मारुती स्तोत्र मराठी मध्ये सुंदर रीतीने सादर केलेले काही व्हिडिओज
चतुर्दश मारूती स्तोत्रे
ज्याप्रमाणे रामदास स्वामींनी 16 श्लोकी श्री मारुती स्तोत्र लिहिले, त्याच पद्धतीने अजूनही चतुर्दश मारुती स्तोत्रे उपलब्ध आहेत आपल्या सोयीनुसार आपण खालील स्तोत्रांचा स्वतःही अभ्यास व पठण करू शकता.
हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला ।
ब्रह्मचारी कपीनाथा विश्वंभरा जगत्पते ॥१॥
कामांतका दानवारी शोकहारी दयानिधे ।
महारुद्रा मुख्य प्राणा मूळमूर्ति पुरातना ॥२॥
वज्रदेही सौख्यकारी भीमरूपा प्रभंजना ।
पंचभूतां मूळमाया तूंचि कर्ता समस्तही ॥३॥
स्थितरूपें तूंचि विष्णू संहारक पशूपती ।
परात्परा स्वयंज्योति नामरूपा गुणातीता ॥४॥
सांगतां वर्णितां येना वेदशास्त्रा पडे ठका ।
शेष तो शिणला भारी नेति नेति परा श्रुती ॥५॥
धन्यावतार कैसा हा भक्तांलागिं परोपरी ।
रामकाजीं उतावेळा भक्तां रक्षक सारथी ॥६॥
वारितों दुर्घटें मोठीं संकटीं धांवतो त्वरें ।
दयाळ हा पूर्ण दाता नाम घेतांच पावतो ॥७॥
धीर वीर कपी मोठा मागें नव्हेचि सर्वथा ।
उड्डाण अद्भुत ज्याचें लंघिलें सागराजळा ॥८॥
देऊनी लिखिता हातीं नमस्कारी सितावरा ।
वाचितां सौमित्र अंगें राम सूखें सुखावला ॥९॥
गर्जती स्वानंदमेळीं ब्रह्मानंदें सकळही ।
अपार महिमा मोठा ब्रह्मांदीकांसि नाकळे ॥१०॥
अद्भुत पुच्छ तें कैसें भोवंडी नभपोकळी ।
फांकडें तेज तें भारी झांकिलें सूर्यमंडळा ॥११॥
देखतां रूप पैं ज्याचें उड्डाण अद्भुत शोभलें ।
ध्वजांत ऊर्ध्व तो बाहू वामहस्त कटीवरी ॥१२॥
कसिली हेमकासोदी घंटा किंकिणि भोंवत्या ।
मेखळें जडलीं मुक्तें दिव्य रत्नें परोपरी ॥१३॥
माथा मुगुट तो कैसा कोटि चंद्रार्क लोपले ।
कुंडलें दिव्य ती कानीं मुक्तामाला विराजते ॥१४॥
केशर रेखिलें भाळीं मुख सुहास्य चांगलें ।
मुद्रिका शोभती बोटीं कंकणें कर मंडित ॥१५॥
चरणीं वाजती अंदू पदीं तोडर गर्जती ।
कैवारी नाथ दीनांचा स्वामी कैवल्यदायकू ॥१६॥
स्मरतां पाविजे मुक्ती जन्ममृत्यूसि वारितो ।
कांपती दैत्य तेजासी भुभुकाराचिये बळें ॥१७॥
पाडितो राक्षसू नेटें आपटी महिमंडळा ।
सौमित्रप्राणदाताचि कपिकूळांत मंडणू ॥१८॥
दंडिली पाताळशक्ती अहीमही निर्दाळिले ।
सोडिलें रामचंद्रा कीर्ति ते भुवनतषरयीं ॥१९॥
विख्यात ब्रीद तें कैसें मोक्षदाता चिरंजिवी ।
कल्याण त्याचेनि नामें भूतपिशाच्च कांपती ॥२०॥
सर्पवृश्चिकपश्वादी विषशीतनिवारण ।
आवडी स्मरतां भावें काळ कृतांत धाकतो ॥२१॥
संकटें बंधनें बाधा दुःखदारिद्र्यनाशका ।
ब्रह्मग्रहपीडाव्याधी ब्रह्महत्यादि पातकें ॥२२॥
पूरवीं सकळही आशा भक्तकामकल्पतरू ।
त्रिकाळीं पठतां स्तोत्र इच्छिलें पावसी जनीं ॥२३॥
परंतु पाहिजे भक्ती संधे कांहीं धरूं नका ।
रामदासा सहाकारी सांभाळितो पदोंपदीं ॥२४॥
(वृत्त )
नमन गा तुज भीमराया।
निजमती मज दे तुज गाया ।
तडकितां तडका तडकाया।
भडकितां भडका भडकाया ॥१॥
हरुषला हर हा वरदानी ।
प्रगटला नटला मज मानीं ।
वदवितां वदनीं वदवितो ।
पुरवितो सदनीं पदवी तो ॥२॥
अवचितां चढला गड लंका ।
पळभरी न धरी मन शंका ।
तडकितां तडके तडकीतो ।
भडकितां भडके भडकीतो ॥३॥
खवळले रजनीचरभारें ।
भडकितां तडके भडमारें ।
अवचिता गरजे भुभुकारें ।
रगडिजे गमकें दळ सारें ॥४॥
कितिकां खरडी खुरडीतो ।
कितेकां नरडी मुरडीतो ।
कितेकां चरडी चिरडीतो ।
कितेकां आरडी दरडीतो ॥५॥
महाबळी रजनीचर आले ।
भीम भयानकसेचि मिळाले ।
रपटितां रपटी रपटेना ।
आपटितां आपटी आपटेना ॥६॥
खिजवितां खिजवी खिजवेना ।
झिजवितां झिजवी झिजवेना ।
रिझवितां रिझवी रिझवेना ।
विझवितां विझवी विझवेना ॥७॥
झिडकितां झिडकी झिडकेना ।
तडकितां तडकी तडकेना ।
फडकितां फडकी फडकेना ।
कडकितां कडकी कडकेना ॥८॥
दपटितां दपटी दपटेना ।
झपटितां झपटी झपटेना ।
लपटितां लपटी लपटेना ।
चनटितां चपटी चपटेना ॥९॥
दडवितां दडवी दडवेना ।
घडवितां घडवी घडवेना ।
बडवितां बडवी बडवेना ।
रडवितां रडवी रडवेना ॥१०॥
कवळितां कवळी कवळेना ।
खवळितां खवळी खवळेना ।
जवळितां जवळी जवळेना ।
मवळितां मवळी मवळेना ॥११॥
चढवितां चढवी चढवेना ।
झडवितां झडवी झडवेना ।
तडवितां तडवी तडवेना ।
गडवितां गडवी गडवेना ॥१२॥
तगटितां तगटी तगटेना ।
झगटितां झगटी झगटेना ।
लगटितां लगटी लगटेना ।
झुगटितां झुगटी झुगटेना ॥१३॥
टणकितां टणकी टणकेना ।
ठणकितां ठणकी ठणकेना ।
दणगितां दणगी दणगेना ।
फुणगितां फुणगी फुणगेना ॥१४॥
चळवितां चळवी चळवेना ।
छेळवितां छळवी छळवेना ।
जळवितां जळवी जळवेना ।
टळवितां टळवी टळवेना ॥१५॥
घसरितां घसरी घसरेना ।
विसरितां विसरी विसरेना ।
मरवितां मरवी मरवेना ।
हरवितां हरवी हरवेना ॥१६॥
उलथितां उलथी उलथेना ।
कलथितां कलथी कलथेना ।
उडवितां उडवी उडवेना ।
बुडवितां बुडवी बुडवेना ॥१७॥
बुकलितां बुकली बुकलेना ।
धुमसितां धुमसी धुमसेना ।
धरवितां धरवी धरवेना ।
सरवितां सरवी सरवेना ॥१८॥
झडपितां झडपी झडपेना ।
दडपितां दडपी दडपेना ।
तटवितां तटवी तटवेना ।
फटवितां फटवी फटवेना ॥१९॥
वळवितां वळवी वळवेना ।
पळवितां पळवी पळवेना ।
ढळवितां ढळवी ढळवेना ।
लळवितां लळवी लळवेना ॥२०॥
धुरकितां धुरके धुरकावी ।
थरकितां थरके थरकावी ।
भरकितां भरके भरकावी ।
झरकिरकितां झरके झरकावी ॥२१॥
परम दास हटी हटवादी ।
लिगटला उतटी तटवादी ।
सिकवितां सिकवी सिक लावी ।
दपटितां दपटून दटावी ॥२२॥
(वृत्त अनुष्टुप्)
अंजनीसुत प्रचंड वज्रपुच्छ कालदंड ।
शक्ति पाहतां वितंड दैत्य मारिले उदंड ॥१॥
धगधगी तसी कळा वितंड शक्ति चंचळा।
चळचळीतसे लिळा प्रचंड भीम आगळा ॥२॥
उदंड वाढला असे विराट धाकुटा दिसे ।
त्यजूनि सूर्यमंडळा नभांत भीम आगळा ॥३॥
लुळीत बाळकी लिळा गिळोनि सूर्यमंडळा।
बहूत पोळतांक्षणीं थुंकिलाचि तक्षणीं ॥४॥
धग्धगीत बूबुळा प्रत्यक्ष सूर्यमंडळा ।
कराळ काळमूख तो रिपूकुळासी दुःख तो॥५॥
रुपें कपी अचाट हा सुवर्णकट्टचास तो ।
फिरे उदास दास तो खळाळ काळ भासतो॥६॥
झळक झळक दामिनी वितंड काळकामिनी ।
तयापरी झळाझळी लुळीत रोमजावळी ॥७॥
समस्तप्राणनाथ रे करी जना सनाथ रे ।
अतूळ तूळना नसे अतूळशक्ति वीलसे ॥८॥
रुपें रसाळ बाळकू समस्तचित्तचाळकू ।
कपी परंतु ईश्वरू विशेष लाधला वरू ॥९॥
स्वरुद्र क्षोभल्यावरी तयासि कोण सावरी ।
गुणागळा परोपरी सतेजरूप ईश्वरी ॥१०॥
समर्थदास हा भला कपीकुळात शोभला ।
सुरारि काळ क्षोभला त्रिकूट जिंकिला भला॥११॥
(वृत्त )
कोपला रुद्र जे काळीं ते काळीं पाहवेचि ना।
बोलणें चालणें कैंचें ब्रह्मकल्पांत मांडला ॥१॥
ब्रह्मांडाहून जो मोठा स्थूळ उंच भयानकु ।
पुच्छ तें मुर्डिलें माथां पाऊल शून्यमंडळा॥२॥
त्याहून उंच वज्रांचा सव्य बाहो उभारिला ।
त्यापुढें दुसरा कैंचा अद्भुत तुळना नसे ॥३॥
मार्तंडमंडळाऐसे दोन्ही पिंगाक्ष ताविले ।
कर्करा घर्डिल्या दाढा उभे रोमांच ऊठिले॥४॥
अद्भूत गर्जना केली मेघची वोळले भुमीं ।
फुटले गिरिचे गाभे तुटले सिंधु आटले ॥५॥
अद्भूत वेश आवेशें कोपला रणकर्कशू ।
धर्मसंस्थापनेसाठी दास तो ऊठिला बळें ॥६॥
(वृत्त )
जनीं ते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू ।
तनू मनू तो पवनू एकचि पाहतां दिसे॥१॥
त्रैलोक्यीं पाहतां बाळें ऐसें तो पाहतां नसे ।
अतूळ तूळना नाहीं मारुती वातनंदनू ॥२॥
चळे तें चंचळें बाळ मोवाळ साजिरे ।
चळताहे चळवळी बाळ लोवाळ गोजिरें ॥३॥
हात कीं पाय कीं सांगों नखें बोटें परोपरी ।
दृष्टीचें देखणें मोठें लांगुळ लळलळीतसे ॥४॥
खडी खारी दडे तैसा पीळ पेंच परोपरी ।
उड्डाण पाहतां मोठें झेंपावे रविमंडळा ॥५॥
बाळानें गिळिला बाळू स्वभावें खेळतां पहा ।
आरक्त पीत वाटोळें देखिलें धरणीवरी ॥६॥
पूर्वेसि देखतां तेथें उडालें पावलें बळें ।
पाहिलें देंखिलें हातीं गिळिलें जाळिलें बहू ॥७॥
थुंकोनि टाकितां तेथें युद्ध जालें परोपरी ।
उपरी ताडिला तेणें एक नामचि पावला ॥८॥
हा गिरी तो गिरी पाहे गुप्त राहे तरूवरी ।
मागुता प्रगटे धांवे झेंपावे गगनोदरी ॥९॥
पळही राहिना कोठें बळेंचि चालितो झडा ।
कडाडां मोडती झाडें वाड वाडें उलंडती ॥१०॥
पवनासारिखा धांवे वावरे विवरें बहू ।
अपूर्व बाळलीला हे रामदास्य करी पुढें ॥११॥
(वृत्त भुजंगप्रयात)
लघूशी परी मूर्ति हे हाटकाची ।
करावी कथा मारुतीनाटकाची ।
असावी सदा ताइतामाजि दंडीं ।
समारंगणीं पाठ दीजे उदंडी ॥१॥
ठसा हेमधातूवरी वायुसुतू ।
तथा ताइताचेपरी रौप्यधातू ।
तयाची पुजा मंदवारीं करावी ।
बरी आवडी आर्त पोटीं धरावी ॥२॥
स्वधामासि जातां प्रभू रामराजा ।
हनूमंत तो ठेविला याच काजा ।
सदा सर्वदा राम दासासि पावे ।
खळीं गांजितां ध्यान सोडून धांवे ॥३॥
(वृत्त )
चपळ ठाण विराजतसे बरें ।
परम सुंदर तें रूप साजिरें ।
धगधगीत बरी उटि सिंदुरें ।
निकट दास कपी विरं हें खरें ॥१॥
कपीवीर जेठी उडे चारि कोटी ।
गिरी द्रोण दाटी तळाथें उपाटी ।
झपेटी लपेटी करी पुच्छवेटी ।
त्रिकुटाचळीं ऊठवी वीर कोटी ॥२॥
रघुविरा समिरात्मज भेटला ।
हरिजनां भजनांकुर फूटला ।
कपिकुळें सकळें मिनलीं बळें ।
रिपुदळें विकळें वडवानळें ॥३॥
कपीवीर तो लीन तल्लीन जाला।
प्रसंगचि पाहोनिं सन्मूख आला।
हनूमंत हें पावला नाम तेथें ।
महीमंडळीं चालिले सर्व येथें ॥४॥
नव्हे सौम्य हा भीम पूर्ण प्रतापी ।
देहो अचळातुल्य हा काळरूपी ।
पुढें देखतां दैत्यकूळें दरारा ।
भुतें कांपती नाम घेतां थरारा ॥५॥
सिमा सांडिली भीमराजें विशाळें।
बळें रेंटिले दैत्य कृत्तांतकाळें ।
गजामस्तकीं केसरीचा चपेटा ।
महारुद्र तैसा विभांडी त्रिकूटा ॥६॥
(वृत्त )
भिम भयानक तो शिक लावी ।
भडकला सकळां भडकावी ।
वरतरू वरता तडकावी ।
बळकटां सकळां धडकावी ॥१॥
सकळ ते रजनीचरभारे ।
सकट बांधत पुच्छ उभारे ।
रडत बोलति वीरच सारे ।
न दिसतांचि बळें भुभुकारे ॥२॥
जळतसे त्रिकूटाचळ लंका ।
धरितसे रजनीचर शंका ।
उमजती उमजे वरघाला ।
अवचितां बुडवी सकळांला ॥३॥
कठिण मार विरांस न साहे ।
रुधिरपूर महीवरि वाहे ।
बहुत भूत भुतावळि आली ।
रणभुमीवरि येउनि घाली ॥४॥
अमर ते म्हणती विर आला ।
नवल हें पुरले सकळांला ।
उदित काळ बरा दिसताहे ।
विधिविधान विधी मग पाहे ॥५॥
(वृत्त )
बळें सर्व संहारिलें रावणाला ।
दिलें अक्षयी राज्य बीभीषणाला ।
रघुनायकें देव ते मुक्त केले ।
अयोध्यापुरीं जावया सिद्ध जालें ॥१॥
पथामाजि कृष्णातिरीं रामराया ।
घडे राहणें स्नानसंध्या कराया ।
सिता राहिली शीरटें गांव जेथें ।
रघूराज तो पश्चिमेचेनि पंथें ॥२॥
जप ध्यान पूजा करी रामराजा ।
तयाचेपरी वीर सौमित्र वोजा ।
स्मरेना देहें चित्त ध्यानस्थ जालें ।
अकस्मात तें तोय अद््भूत आलें ॥३॥
बळें चालिला ओघ नेटें भडाडां ।
नभीं धांवती लोट लाटा धडाडां ।
नदी चालली राम ध्यानस्थ जेथें ।
बळें विक्रमें पावला भीम तेथें ॥४॥
उभा राहिला भीमरूपी स्वभावें ।
बळें तुंब तो तुंबिला दोन गांवें ।
नदी एक विभागली दोन्हि बाहें ।
म्हणोनि तया नांव हें गांव बाहें ॥५॥
सुखें लोटती देखतां रामलिंगा ।
बळें चालिली भोंवती कृष्णगंगा ।
परी पाहतां भीम तेथें दिसेना ।
उदासीन हें चित्त कोठें वसेना ॥६॥
हनूमंत पाहावयालागिं आलों ।
दिसेना सखा थोर विस्मीत जालों ।
तयावीण देवालयें तीं उदासे ।
जळांतून बोभाइला दास दासें ॥७॥
मनांतील जाणोनि केला कुढावा ।
दिले भेटिचा जाहला थोर यावा ।
बळें हांक देतांचि तैसा गडाडी ।
महामेघ गंभीर जैसा घडाडी ॥८॥
रघुराज वैकुंठधामासि गेले ।
तधीं मारुती दास हे नीरवीले ।
रघूनाथ उपासकाला प्रसंगें ।
सख्या मारुती पाव रे लागवेगें ॥९॥
प्रभूचे महावाक्य त्वां साच केलें ।
म्हणें दास हें प्रत्यया सत्य आलें ।
जनामाजि हें सांगतां पूरवेना ।
अवस्था मनीं लागली ते सरेना ॥१०॥
(वृत्त मालिनी)
भुवनदहनकाळीं काळ विक्राळ जैसा ।
सकळ गिळित ऊभा भासला भीम तैसा ।
दुपटत कपि झोंकें झोंकिली मेदिनी हे ।
तळवट धरि धाकें धोकलीं जाउं पाहे ॥१॥
गिरिवरुनि उडाला तो गिरी गुप्त झाला ।
घसरत दश गांवें भूमिकेमाजि आला ।
उडती झडझडाटें वृक्ष हे नेटपाटें ।
पडति कडकडाडें अंग घातें धुधाटें ॥२॥
थरथरित थरारी वज्र लांगूल जेव्हां ।
गरगरीत गरारी सप्तपाताळ तेव्हां ।
फणिवर कमठाचे पृष्ठिशीं आंग घाली ।
तगटित पवनाची झेंप लंकेसि गेली ॥३॥
थरकत धरणी हे हाणतां वज्रपुच्छें ।
रगडित रणरंगीं राक्षसें तृणतुच्छें ।
सहज रिपुदळाचा थोर संव्हार केला ।
अवघड गड लंका शीघ्र जाळून आला ॥४॥
सहज करतळें जो ठेरुमांदार पाडी ।
दशवदन रिपू हे कोण कीती बराडी ।
अगणित गणवेना शक्ति काळासि हारी ।
पवनतनुज पाहो पूर्ण रुद्रावतारी ॥५॥
(वृत्त मालिनी)
फणिवर उठवीला वेग अद्भूत केला ।
त्रिभुवनजनलोकीं कीर्तिचा वोघ गेला ।
रघुपतिउपकारें दाटलें थोर भारें ।
परम धिर उदारें रक्षिलें सौख्यकारें ॥१॥
सबळ दळ मिळालें युद्ध ऊदंड झालें ।
कपिकटक निमालें पाहतां येश गेलें ।
परदळशरणघातें कोटिच्या कोटि प्रेतें ।
अभिनवचरणपातें दुःख बीभीषणातें ॥२॥
कपिसिरसघनदाटी जाहली थोर आटी ।
म्हणउनि जगजेठी धांवणें चारि कोटी ।
मृतिविरहित ठेले मोकळे सिद्ध झाले ।
सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ॥३॥
बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणनाथा ।
उठविं मज अनाथा दूर सारूनि वेथा ।
झडकरि भिमराया तूं करीं दृढ काया ।
रघुविरभजना या लागवेगेंचि जाया ॥४॥
तुजविण मज पाहें पाहतां कोण आहे ।
म्हणउनि मन माझें रे तुझी वाट पाहे ।
मज तुज निरवीलें पाहिजे आठवीलें ।
सकळिक निजदासांलागिं सांभाळवीलें ॥५॥
उचित हित करावें उद्धरावें धरावें ।
अनहित न करावें त्वां जनीं येश घ्यावें ।
अघटित घडवावें सेवकां सोडवावें ।
हरिभजन घडावें दुःख तें वीघडावें ॥६॥
प्रभुवर विरराया जाहली वज्र काया ।
परदळ निवटाया दैत्यकूळें कुटाया ।
गिरिवर उतटाया रम्यवेषें नटाया ।
तुजचि अलगठाया ठेविलें मुख्य ठाया ॥७॥
बहुत सबळ सांठा मागतों अल्प वांटा ।
न करित हित कांटा थोर होईल ताठा ।
कृपणपण नसावें भव्य लोकीं दिसावें ।
अनुदिन करुणेचें चिन्ह पोटीं वसावें ॥८॥
जळधर करुणेचा अंतरामाजि राहे ।
तरि तुज करुणा हे कां नये सांग पां हे ।
कठिण हृदय जालें काय कारुण्य गेलें ।
न पवसि मज कां रे म्यां तुझें काय केलें ॥९॥
वडिलपण करावें सेवकां सांवरावें ।
अनहित न करावें तूर्त हातीं धरावें ।
निपटचि हटवादें प्रार्थिला शब्दभेदें ।
कपि घन करुणेचा वोळला रामवेधें ॥१०॥
बहुतचि करुणा या लोटली देवराया ।
सहजचि कफकेतें जाहली वज्र काया ।
परम सुख विलासे सर्वदासनुदासें ।
पवनतनुज तोषें वंदिला सावकाशें ॥११॥
(वृत्त चामर)
रुद्र हा समुद्र देखताक्षणीं उठावला ।
शिराणीचें किराण सज्ज त्रिकुटास पावला ।
वात जातसे तसाचि स्थूळ देह राहिला ।
वावरोनि विवरोनि तो त्रिकूट पाहिला ॥१॥
हीन देव दीनरूप देखतांचि पावला ।
गड्गडीत धड्धडीत कड्कडीत कोपला ।
लाटि कूटि पाडि फोटि झोडि झोडि झोडला ।
दैत्यलोक एक हाक सर्वगर्व मोडिला ॥२॥
सानरूप तें स्वरूप गुप्तरूप बैसला ।
पुच्छकेत शोध घेत त्रीकुटांत बैसला ।
गड्गडी दिसेचिना बुझेल कोण कैसला ।
वळवळी चळवळी विशाळ ज्वाळ जैसला ॥३॥
काळदंडसे प्रचंड ते वितंड जातसे ।
भारभार राजभार पुच्छमार होतसे ।
पाडिले पछाडिले रुधीरपूर व्हातसे ।
दैत्य बोलती बळें पळोन काय घ्यातसे ॥४॥
काळकूट तें त्रिकूट धूट धूट ऊठिलें ।
दाट थाट लाट लाट कूट कूट कूटिलें ।
घोर मार ते सुमार लूट लूट लूटिले ।
चिर्डिलेचि घर्डिलेचि फूट फूट फूटिले ॥५॥
दाट थाट आट घाट तें कपाट घातलें ।
सर्व रोध तो निरोध थोर दुःख पावले ।
सैन्य कट्ट त्यासी घट्ट कर्करून बांधिलें ।
थोर घात त्यास पात चर्फडीत चेंदलें ॥६॥
वज्र पुच्छ त्यासि तुच्छ मानिलें निशाचरीं ।
सर्वही खण्खणाट ऊठिले घरोघरीं ।
फुटेचिना तुटेचिना समस्त भागलें करीं ।
लट्लटीत कांपती बहुत धाक अंतरीं ॥७॥
थोर थोर दूर दूर दाट दाट दाटले ।
कोण मस्त तंग बस्त थाट थाट थाटले ।
मंदिरीं घरोघरीं अचाट पुच्छ वाढलें ।
दैत्यनास तो घसास काट काट काटले ॥८॥
हात पाय मान माज वोढितें पछाडितें ।
अडचणीत अड्कवूनि पीळ पेंच काढितें ।
लोहदंडसें अखंड राक्षसांसि ताडितें ।
मूळ जाळ व्याळ जाळ दैत्यकूळ नाडितें ॥९॥
थोर धाक एक हाक त्रीकुटासि पूरले ।
घरोघरींच चळवळी पुढें उदंड ऊरलें ।
बैसले उदंड दैत्य तैं सभेत घूसले ।
सभा विटंबिली बळेंचि कोणसें न सूचलें ॥१०॥
देह मात्र एक सूत्र थोर यंत्र हालिलें ।
पुरोनि ऊरलें बळें सभेमधेंचि चालिलें ।
रत्नदीप तेलदीप तेज सर्व काढिलें ।
लाटि कूटि धामधूम पाडिले पछाडिले ॥११॥
गुप्तरूप मारुती दशाननाकडे भरे ।
मुगुट पाडिला शिरीं कठोर वज्र ठोंसरे ।
सभा विटंबिली बळेंचि गर्गरीत वावरे ।
बलाढ्य दैत्य मारिले कठीण पुच्छ नावरे ॥१२॥
हस्तमार दैत्यमार दंडमार होतसे ।
लंडसे कलंडले उलंडलेचि मंडसे ।
येत येत पुच्छकेत दैत्य सर्व बोलती ।
गळीत बैसले भुमीं न बोलती न चालती ॥१३॥
स्वप्नहेत सौख्य देत दैत्यघात भावला ।
रुद्र हा उठावला कुढावयासि पावला ।
जाळिलें त्रिकूट नीट आपटून रावणी ।
राक्षसांसि थोर दुःख ऊसिणें ततक्षणीं ॥१४॥
दीनरूप देव सर्व हास्यरूप पाहिलें ।
कळ्वळून अंतरीं रघुत्तमासि वाहिलें ।
एक वीर तो सधीर थोर धीर ऊठला ।
तोष तोष तो विशेष अंतरींच दाटला ॥१५॥
उदंड देव आटिले तयांसि भीम आटितो ।
रामदूत वातसूत लाटि लाटि लाटितो ।
ऊठ आमुचे समस्त कूट कूट कूटितो ।
धूट धूट दैत्य त्यास लूट लूट लूटितो ॥१६॥
समस्त दैत्य आळितो बळें त्रिकूट जाळितो ।
पुरांत गोपुरें बरीं निशाचरांसि वाळितो ।
उदंड अग्नि लाविला बहू बळें उठावला ।
कडाडिला तडाडिला भडाडिला धडाडिला ॥१७॥
उदंड जाळिलीं घरें कितेक भार खेंचरें ।
किलाण धांवती भरें सुरांसि वाटलें बरें ।
वितंड दैत्य धांवडी तयांत पुच्छ भोंवडी ।
कडाकडी खडाखडी गडागडी घडाघडी ॥१८॥
बळें चपेट मारिला उदंड दैत्य हारिला ।
तरारिला थरारिला भयंकरू भरारिला ।
गद्गदी तनू वितंड सागरीं सरारिला ।
जानकीस भेटला प्रभूकडे झरारिला ॥१९॥
काळसे विशाळ दैत्य त्यांत एकला भरे ।
थोर धाक एक हाक काळचक्र वावरे ।
शक्ति शोधिली बळेंचि भव्य देखिले धुरे ।
वानरांसहीत रामदास भेटले त्वरें ॥२०॥
(वृत्त )
कपिवर उठविला वेग अद्भुत केला
त्रिभुवनजनलोकी कीर्तीचा घोष केला
रघुपति उपकारें दाटले थोर भारें
परम धिर उदारें रक्षिले सौख्यकारें ॥१॥
सबळ दळ मिळालें युध्य ऊदंड जालें
कपिकटक निमालें पाहतां यश गेलें
परदळशरघातें कोटिच्या कोटी प्रेतें
अभिनव रणपातें दुःख बीभीषणातें ॥२॥
कपिरिसघनदाटी जाहली थोर आटी
म्हणउनि जगजेठी धांवणी च्यारि कोटी
मृत्यविर उठविले मोकळे सीध जाले
सकळ जन निवाले धन्य सामर्थ्य चाले ॥३॥
बहु प्रिय रघुनाथा मुख्य तूं प्राणनाथा
उठवि मज आता अनाथा दूरी सारूनि वेथा
झडकरी भिमराया तूं करी दृढ काया
रघुविभजना या लागवेगें चि जाया ॥४॥
तुजविण मज पाहे पाहतां कोण आहे
म्हणउनि मन माझें रे तुझी वास पाहे
मज तुज निरावीलें पाहिजे आठविलें
सकळिक निजदासांलागि सांभाळविलें ॥५॥
उचित हित करावें उधरावें धरावें
अनुचित न करावें तां जनीं येश घ्यावें
अघटित घडवावें सेवकां सोडवावें
हरिभजन घडावें दुःख तें वीघडावें ॥६॥
प्रभुवर विरराया जाहली वज्रकाया
परदळ निवटाया दैत्यकूळें कुटाया
गिरिवर उतटाया रम्य वेशें नटाया
तुज चि अलगटाया ठेविलें मुख्य ठाया ॥७॥
बहुत सबळ साठा मागतो अल्प वांटा
न करित हितकांटा थोर होईल तांठा
कृपणपण नसावे भव्य लोकीं दिसावें
अनुदिन करुणेचें चिह्न पोटी वसावें ॥८॥
जळधर करूणेचा अंतरामाजि राहे
तरि तुज करूणा हे कां न ये सांग पाहे
कठिण हृदय जालें काय कारुण्य गेलें
न पवसि मज कां रे म्यां तुझे काय केले ॥९॥
वडिलपण करावें सेवकां सांवरावे
अनहित न करावें तुर्त हाती धरावें
निपट चि हटवादें प्रार्थिला शब्दभेदें
कपि घन करूणेचा वोळला रामवेधें ॥१०॥
बहुत चि करूणा या लोटली देवराया
सहज चि कफकेतें जाहली वज्रकाया
परम सुख विळासे सर्व दासानुदासें
पवनमुज तोषें वंदिलो सावकाशें ॥११॥
तर मित्रांनो,
आपण वरील आर्टिकल मध्ये मारुती स्तोत्र मराठीमध्ये पठन केल्याने काय फायदा होतो ते विस्तृतपणे पाहिले.
आपणही ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करून श्री मारुती स्तोत्र आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवावे, व सगळ्यांना या स्तोत्राचा फायदा करून द्यावा.
त्याचप्रमाणे अजूनही चतुर्दश मारुती स्तोत्रे पठण करून सुख शांती संपादन करून घ्यावी.
या वेबसाईटवर आपल्याला श्री मारुती बद्दल संपूर्णपणे माहिती उपलब्ध आहे तरी आपण सगळ्या पोस्ट व्यवस्थितपणे पहाव्या.
